विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “भाजप घराघरात जाऊन महिलांना सिंदूर वाटणार,” अशा आशयाच्या बातम्या फेक न्यूज असून अशा प्रकारची कोणतीही मोहीम चालविणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हिंदी दैनिक दैनिक भास्कर आणि झी न्यूज यांच्यासह काही माध्यमांनी यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालव्यांनी या बातम्यांना “फेक न्यूज” असल्याचे सांगितले आहे.
( Fake news about BJPs Sindoor distribution campaignParty clarifies that there is no such program)
दैनिक भास्करने “मोदी सरकार घराघरात सिंदूर पोहोचवणार: ९ जूनपासून महिनाभर चालणाऱ्या मोहिमेअंतर्गत खासदार दररोज १५-२० किमी पदयात्रा करणार” अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात नाव न उघड करता एका भाजप नेत्याचा हवाला देण्यात आला होता. झी न्यूजनेही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नावाने अशीच बातमी दिली होती.
या बातम्यांनुसार, ९ जूनपासून भाजपकडून सार्वजनिक संपर्क मोहीम राबवण्यात येणार असून त्यात महिलांना सिंदूर देऊन माहितीपत्रके वाटली जातील, असे म्हटले होते.
मात्र, आता भाजपकडून हे वृत्त पूर्णतः खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. अमित मालवीय यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, “दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या या फेक न्यूजवर अनेक जण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविकता ही की, भाजपकडून अशा कोणत्याही सिंदूर वाटप मोहिमेची आखणी करण्यात आलेली नाही.”
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या फेक न्यूजच्या आधारे पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावर उत्तर देताना मालवीय म्हणाले, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकृत व्यासपीठावरून या निराधार वृत्ताचा वापर राजकीय टीका करण्यासाठी केला. .”
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, “पंतप्रधान मोदी हे प्रत्येक महिलेचा पती असल्यासारखे वागत आहेत. जर ते सिंदूर वाटत असतील, तर त्यांनी आधी स्वतःच्या पत्नीला सिंदूर का दिला नाही?”
या टीकेवर उत्तर देताना मालवीय म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष द्यावे. बंगाल सध्या सांप्रदायिक तणावात जळत आहे, महिलांची सुरक्षा धोक्यात आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. हे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत.”
काँग्रेस प्रवक्त्यांनाही मालवीय यांना लक्ष्य केले. “हे लोक केवळ थिल्लरपणाच्या पातळीवर पोहोचले आहेत. त्यांच्याकडून काही शहाणपणाची अपेक्षा ठेवणे मूर्खपणा ठरेल,” असे त्यांनी म्हटले. काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाथ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत विचारले होते की, “बायका फक्त नवऱ्याच्या नावे सिंदूर लावतात. मग भाजपचे कार्यकर्ते कोणत्या हक्काने महिलांना सिंदूर देणार?”
भाजपने स्पष्ट केले आहे की, सध्या कोणतीही ‘सिंदूर वाटप’ मोहीम राबवली जात नाही आणि या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये.