विशेष प्रतिनिधी
पुणे :पुणे जिल्ह्यातील जेजुरी ते मोरगाव रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. जेजुरीहून मोरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट डिझायर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोमधून सामान उतरत असलेले मजूर, टेम्पोसमोर उभे असलेले नागरिक आणि कारमधील प्रवासी यामधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ( Fatal accident on Jejuri-Morgaon roadEight people killed on the spot five seriously injured)
ही घटना जेजुरीजवळील किर्लोस्कर कंपनीच्या समोरील श्रीराम ढाब्याजवळ घडली. स्विफ्ट डिझायर (MH 42 AX 1060) या कारने पिकअप टेम्पो (MH 12 XM 3694) ला धडक दिल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या कारवर (MH 12 TK 9483) आदळली. त्या क्षणी टेम्पोमधून सामान उतरवले जात होते आणि परिसरात काही नागरिक उभे होते. अचानक घडलेल्या या भीषण अपघातामुळे मोठा अनर्थ ओढवला.
मृतांमध्ये सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप, ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) यांचा समावेश आहे. एक मृत व्यक्ती ओळख पटलेली नाही.
जखमी झालेल्यांमध्ये दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी स्विफ्ट कारच्या अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.