विशेष प्रतिनिधी
मुंबई : आताच्या काळातील अनाजीपंत मुंबईत येऊन विष कालवून गेले आहेत. भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ( File a case of sedition against Bhaiyyaji Joshi, Uddhav Thackeray’s demand)
मुंबईत येणाऱ्याला मराठी आलेच पाहिजे असं काही नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांचा अनाजीपंत असा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला आहे. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला, अशी काही लोक आपल्या देशात आहेत. ही लोक जगभर ब्रह्मज्ञान सांगत असतात. यातील एक अनाजीपंताने बुधवारी मुंबईत येऊन, ‘मुंबईत राहणाऱ्याला मराठी यावे,’ अशी गरज नाही, असे एक द्वेषाचे गोमूत्र शिंपडून गेले. याचा अर्थ हा संघ आणि भाजपचा छुपा अजेंडा आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. बरेच दिवस झाले, पाकिस्तानचा विषय काढलेला नाही. बटेंगो तो कटेंगे हा नवा मुद्दा काढला आहेत. बटेंगो तो कटेंगे म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लीम असे नाही. मराठी विरुद्ध अमराठी, मराठा विरुद्धा मराठेतर, अशी वाटणी करून राज्य बळकवण्याचे काम चालू आहे.
“या अनाजीपंतांनी ( भैय्याजी जोशी ) अशी भाषा अहमदाबाद, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, बंगाल करून दाखवावी. नंतर सुखरूप येऊन दाखवावे. मराठी माणूस सहहृदयी, दयाशील आहे म्हणून कुणाही यावे, टपली मारू जावे, अशी परिस्थिती आहे. भाषावर प्रांतरचना मुंबईची झाली आहे. आता हे गल्लीची भाषावर रचन करत आहेत की काय? तोडा-फोडा राज्य करा ही विकृत मानसिकता समोर आली आहे,” अशी टीका ठाकरेंनी जोशींवर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘प्रशांत कोरटकर-कोरटकर काय करता, तो चिल्लर माणूस आहे.’ तसे, भैय्याजी-भैय्याजी काय करता, भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची मी मुख्यमंत्री असताना केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा आली नाही तरी चालेल, असे बोलणाऱ्यावर कायद्याचा बडगा उगरला, तर परत असे कुणी बोलणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई करावी किंवा पाप मान्य करावे,” असे आव्हान ठाकरेंनी दिले आहे.