विशेष प्रतिनिधी
मुंबई : सांगली जिल्ह्यातील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी दीड कोटींच्या थकित बिलासाठी आत्महत्या केल्यामुळे विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे. मात्र हर्षल पाटील यांना सरकारने कंत्राटच दिले नव्हते असे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. ( Finance Minister and Deputy Chief Minister of the state Ajit Pawar clarified that the government had not given the contract to Harshal Patil.)
जल जीवन मिशन योजनेचे काम करूनही १ कोटी ४० लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्यामुळे हर्षल पाटील यांनी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर सरकारवर टीका केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा रहिवाशी असलेला हर्षल पाटील हा कंत्राटदार होता. काही दिवसांपूर्वी हर्षल पाटील यांनी सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या नावावर ६५ लाखांचं कर्ज काढलं होतं. यामुळे त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज झालं होतं. जल जीवन मिशनच्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या थकीत बिलामुळे मानसिक तणावात येऊन त्यांने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे.
या प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही काम दुसऱ्या कंत्राटदाराने दिले होते. सकाळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मी याची माहिती घेतली. आम्ही नेमलेल्या कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्टर नेमला होता. आमचा संबंध कंत्राटदाराशी येतो. कंत्राटदाराने बिले पाठवल्यानंतर सरकार पैसे देते. सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही. कंत्राटदार आणि त्यांचे काय झालं हे आम्हाला माहिती नाही. जल जीवन ही केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये ५० टक्के निधी केंद्राचा आणि ५० टक्के निधी राज्याचा असतो. आम्ही त्यांना कंत्राट दिलं नव्हतं. तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्याने आत्महत्या करणं या मागच्या कारणांचा शोध घेतला जाईल. त्याच्या मोबाईलमध्ये काही आहे का, त्याने काही लिहून ठेवलं आहे का, हे कृत्य करायच्या आधी कुणाला फोन केले अशा प्रकरची सगळी माहिती पोलीस यंत्रणा मिळवेल.
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की , सरकार अमानुष निर्दय आहे. स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत. हर्षल पाटील ची आत्महत्यां ही मराठी तरुणांची अगतिकता आहे.सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहेहाय कोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा.
शेतकरी आत्महत्या करत होते, आता या सरकारने कंत्राटदारांनाही आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. मोठ्या कंत्राटदारांसाठी रेड कार्पेट, आणि लहान कंत्राटदारांची बिलं थकवली जात आहे, हा सरकारचा न्याय आहे का? निवडक लाडक्या कंत्राटदारांना प्राधान्य दिल्यानेच लहान कंत्राटदारांवर ही वेळ आली का? राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे हे सत्य स्पष्ट आहे. आर्थिक शिस्त बिघडली आहे, अजूनही हे सत्य अर्थमंत्री आणि सरकार नाकारणार की जबाबदारी घेणार आहे? असा सवाल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार याना केला आहे.