विशेष प्रतिनिधी
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ मदतीचा हात पुढे करत प्रारंभी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली होती. मात्र, या मदतीत मोठी वाढ करत राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
( Financial assistance of Rs 50 lakhs to the families of those killed in Pahalgam attack)
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती देताना सांगितले की, “हे केवळ आर्थिक सहाय्य नसून राज्य सरकारची पीडित कुटुंबीयांसोबतची सहवेदना आणि जबाबदारी व्यक्त करणारा एक संवेदनशील निर्णय आहे. हे पैसे त्यांच्या आयुष्याला पुन्हा एक दिशा देण्यासाठी छोटासा आधार ठरावा, अशी आमची भावना आहे.
महाराष्ट्रातील पुणे, पनवेल आणि डोबिंवलीतील पर्यटकांना या हल्ल्यात आपले प्राण गमावावे लागले आहेत. डोंबिवलीमधील तिघांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोघांनी या हल्ल्यात प्राण गमावले असून पनवेलमधील एका पर्यटकाचा गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन डोंबिवलीकरांचा बळी गेला होता. पुण्यातील कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे आणि पनवेलच्या दिलीप डिसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
हे सर्व पर्यटक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात गेले होते. परंतु, त्यांच्या आयुष्याचा अंत एका भीषण हल्ल्यात झाला. डोंबिवलीतील एका कुटुंबातील दोघे भावंडे आणि त्यांचा मित्र, पुण्याचे दोन मित्र तर पनवेलचा एक मध्यमवयीन पर्यटक हे सगळे अचानक झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडले.
राज्य सरकारने जखमी पर्यटकांच्या उपचाराचा खर्चही उचलण्याचा निर्णय घेतला आहे.