विशेष प्रतिनिधी
पुणे : साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरात शुक्रवारी (१६ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
नवनाथ चंद्रकांत रिठे (वय २७, शेरेचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी ( १६ मे) दौंड तालुक्यातील कुरकुंभ मधील पुणे- सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पीडित मुलीचे आरोपीने अपहरण केले. त्यानंतर त्याने मुलीला मळद (ता. दौंड जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका हॉटेलच्या अलीकडील उसाच्या शेतात नेहून तिला मारहाण करत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, तेथील स्थानिकांनी मुलीच्या रडण्याचा तसेच किंचाळण्याचा आवाज ऐकला. त्यांनी तातडीने ऊसाच्या शेताकडे धाव घेतली. तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनी नराधम रिठे याला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक नागरिकांनी वेळीच नराधमाला पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक मीरा मटाले करीत आहेत.