विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले होते.
( Former Jammu and Kashmir Governor Satya Pal Malik passes away)
मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कॉलेज शिक्षणापासूनच राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे सत्यपाल मलिक हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते. सत्यपाल मलिक गेल्या काही वर्षांत भाजपशी संबंधित होते. त्यांनी अनेक वर्षे राज्यपाल म्हणून काम केले. गेल्या काही वर्षांपासून ते सरकारविरुद्ध आरोप करत होते. यामुळे ते चर्चेत आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते.
ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. ११ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे ते राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळातच आजच्याच दिवशी, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले.
सत्यपाल यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी झाला. ते 2018 ते 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे 10 वे आणि शेवटचे राज्यपाल होते. याव्यतिरिक्त, त्यांनी गोवा आणि मेघालयाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. ते 1974-77 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. ते 1980-86 आणि 1986-89 मध्ये राज्यसभेचे आणि 1989-91 मध्ये नवव्या लोकसभेचे सदस्य होते. ते बिहारचे राज्यपाल देखील होते.