विशेष प्रतिनिधी
लातूर : पावसाच्या पाण्यातून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून फॉर्च्युनर कार पाच ते सहा वेळा उलटून झालेल्या गंभीर अपघातात माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( Former Majalgaon MLA R.T. Deshmukh dies in a horrific accident in which his Fortuner overturned)
औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर पाणी साचले होते. या या अपघातात आरटी देशमुख गाडीच्या बाहेर फेकले गेले आणि उलटणाऱ्या गाडीचा धक्का लागून ते गंभीर जखमी झाले. गाडी त्यांच्या अंगावरच पडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार त्यांच्या अंगावरून हटवली आणि तातडीने लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
भाजपकडून ते माजलगाव मतदारसंघात निवडून आले होते. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक होते. पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे. मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची ओळख होती.
२०१४ मध्ये माजलगाव मतदारसंघातून आर. टी. देशमुख यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत विजय मिळविला होता. . सलग तीन वेळा आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा ३७ हजार २४५ मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये माजलगावातून भाजपनं रमेशराव कोकाटे यांना उमेदवारी दिली. सोळंके यांनी कोकाटे यांचा १२ हजार ८९० मतांनी पराभव केला.