विशेष प्रतिनिधी
गडचिरोली :गडचिरोली पोलिस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत आज (२३ मे) सकाळी चार कडवट माओवादी ठार करण्यात आले. नुकत्याच २० मे रोजी पाच जहाल नक्षल्यांना अटक करून मोठा घातपात टाळण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेदरम्यान इंद्रावती नदीच्या काठावर पोलिस व नक्षल्यांमध्ये दोन तास चाललेल्या चकमकीत हे चार माओवादी ठार झाले. ( Four hardcore Naxalites killed in Gadchiroli Plot to carry out an attack foiled)
या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये सन्नू मासा पुंगाटी (भामरागड दलमचा कमांडर, ८ लाखांचे बक्षीस), अशोक उर्फ सुरेश पोरीया वड्ड, विज्यो उर्फ विज्यो होयामी (२ लाखांचे बक्षीस, १२ गुन्ह्यांत सहभाग), आणि करुणा उर्फ ममीता उर्फ तुनी पांडे वसरे (९ गुन्ह्यांत सहभागी) यांचा समावेश आहे.
या कारवाईसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली १२ सी-६० पथके (एकूण ३०० कमांडो) आणि सीआरपीएफची तुकडी कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत रवाना झाली होती. गुप्त माहितीवरून हे माओवादी नेलगुंडा आणि कवंडे परिसरात दबा धरून असल्याचे समजताच गुरुवारी दुपारी कारवाईला सुरुवात झाली.
सकाळी शोध मोहीम सुरू असताना नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही जोरदार कारवाई केली. घटनास्थळी एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल, दोन .303 रायफल्स, एक भरमार बंदूक, वॉकी-टॉकी, छावणी आणि नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. उर्वरित नक्षल्यांचा शोध सुरूच असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.