विशेष प्रतिनिधी
पुणे : यवत येथील एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर दरोडा घालून कुटुंबीयांना बेदम मारहाण करून एकच खून करून पसार झालेल्या चार परप्रांतीय आरोपींना पुण्याच्या येरवडा परिसरामधून अटक करण्यात आली. ते परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते. हे सर्वजण एका गुऱ्हाळात काम करीत होते. ( Four immigrants arrested for robbery and murder in Yavat)
विश्वजीत शशिकांत चव्हाण (वय ३३, रा. सहकारनगर, यवत, ता. दौंड) यांचा मारहाणीत मृत्यू झाला. सलमान दिलशाद शेख (वय २८), मोमीन अकबर शेख (वय ४५, दोघे रा. पठाणकोट मोहल्ला, जि. बागपत, उत्तर प्रदेश), रावतसिंग चौधरी जगजीतसिंग तोमर (वय २६), गुलशन उर्फ मोटा जहाँगीर खान (वय २५, दोघे रा. बडौत, जि. बागपत, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी यवत परिसरात एका गुऱ्हाळात काम करत होते.
चव्हाण हे यवत गावातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहण्यास होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घरावर आरोपी शेख, तोमर, खान यांनी दरोडा टाकला. चव्हाण यांना बेदम मारहाण करीत त्यांचा खून केला. घरामधील दोन महिलांसह चैाघांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या घरामधील मौल्यवान ऐवज लुटून चोरटे पसार झाले. चव्हाण यांची पत्नी सारिका बचावाकरिता आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी आरोपी रेल्वे रुळाच्या लागतच्या बाजूने अंधारात पसार झाले. हा आरडाओरडा ऐकून जाग्या झालेल्या नागरिकांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. मात्र, ते हाती लागू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश दडस, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपी येरवडा परिसरात असून खासगी बसने उत्तर प्रदेशात पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. दरम्यान, पोलिसांनी सापळा लावला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, राहुल गावडे, प्रवीण सपांगे, सुवर्णा गोसावी, अभिजित सावंत, अमित सिद-पाटील, किशोर वागज, सलीम शेख, सहायक फौजदार ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख यांनी आरोपींना जेरबंद केले.