विशेष प्रतिनिधी
पुणे : तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चार वर्षांच्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ( Four-year-old girl trapped on third floor rescued safely)
गुजर निंबाळकरवाडी येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये थरारक प्रकार घडला आहे. चार वर्षांची भाविका ही तिच्या आईने, मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना तिसऱ्या मजल्यावरील घरात एकटीच बंद करून बाहेरून कुलूप लावले. घरात अडकलेली भाविका चालत खिडकीजवळ गेली आणि लोखंडी गजामधून डोकं बाहेर काढत सज्जावर पोहोचली. तिथून तिने खिडकीचा गज घट्ट पकडून ठेवला, कारण तीला समजलं की ती धोकादायक ठिकाणी आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
हा धक्कादायक प्रकार पाहून सोसायटीतील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी अग्निशमन दलात तांडेल म्हणून कार्यरत असलेले योगेश चव्हाण हे सुटीमुळे घरीच होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली, मात्र दरवाजाला कुलूप असल्याने त्यांनी पुन्हा खाली जाऊन मुलीच्या आईकडून चावी घेतली. त्यांनी दरवाजा उघडत सज्ज्यावर अडकलेल्या भाविकाला आत खेचून सुखरूप वाचवले.
ही घटना सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी घडली. काही क्षणांनी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. परिसरात काही वेळ गोंधळाची स्थिती होती, मात्र भाविका सुखरूप आत घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.