विशेष प्रतिनिधी
पुणे: शेअर बाजारातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची २२ लाखांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Fraud of Rs 22 lakhs with the lure of excess profits from the stock market)
सचिन नारायण शेट्टी (वय ४७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिन रिशा चोप्रा तसेच विविध अॅप आणि बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १२ डिसेंबर २०२४ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत फिर्यादी यांना ऑनलाईन पद्धतीने लिंक पाठवल्या. फिर्यादी यांना त्यामध्ये माहीती भरण्यास सांगितले. तसेच या लिंकवरून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. या अॅपमधून शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना थोडीशी रक्कम देण्यात आली. अशा पद्धतीने आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना विविध बँक खात्यांवर २३ लाख ०८ हजार ६०० रुपये पाठविण्यास सांगितले. सुरुवातीला त्याबदल्यात आरोपीने फिर्यादी यांना ८० हजार रुपये नफा दिला. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न देता २२ लाख २८ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी पोलिसांनी ‘के २ चार्ल्स स्टॅनली वेल्थ स्ट्रॅटेजी’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिन रिशा चोप्रा तसेच ‘शेअरखान (पीएफए)’ अॅपधारक तसेच विविध लिंक आणि बँक खाते धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.