विशेष प्रतिनिधी
पुणे: संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांचे मोबाईल, तसेच महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावुन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय व परजिल्ह्यातील टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ( Gang arrested for stealing jewellery mobile phones during palanquin ceremony)
गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि सहाने केलेल्या कारवाईत पाच गुन्हे उघडकीस आले. तसेच या कारवाईत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पालखी मार्गावर दरवर्षी गर्दीचा गैरफायदा घेऊन काही टोळ्या महिलांचे मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरतात. यावर्षीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम राबवली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यात महिलांचे दागिने चोरणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चांदनी शक्ती कांबळे (वय ३२), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५,), बबीता सुरज उपाध्ये (वय ५७), पुजा धीरज कांबळे (वय ३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर), आणि गणेश विलास जाधव (वय ३०, रा. ब्याळगी, ता. अक्कलकोट) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडून सोन्याचे गंठण, मंगळसुत्र असे १९ लाख ४१ हजार ३१० रुपयांचे २२.५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे या कारवाईनंतर उघडकीस आले आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी अरबाज नौशाद शेख (वय १९, रा. झारखंड) आणि एका अल्पवयीनास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास करून त्यांच्या ताब्यातून साडे चार लाख रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर हडपसर पोलीस ठाण्यातील दोन आणि वानवडी पोलीस ठाण्यात दाखल एक असे मोबाईल चोरीचे तीन गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि सहाच्या निरीक्षक वाहिद पठाण, संजय पतंगे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे व जावेद शेख यांचे पथकाने ही कारवाई केली.