विशेष प्रतिनिधी
पुणे : महिलांवरील अत्याचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात महिलांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे .
उपचार घेण्याच्या बहाण्याने आरोपी केंद्रात येत होते आणि महिलांना टॉप काढण्यास भाग पाडत होते. त्यानंतर स्वतःला एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असल्याचे सांगून, जर त्यांच्या आदेशाचे पालन केले नाही, तर केंद्र बंद करण्याची धमकी देत होते. या दरम्यान इतर साथीदार आतमध्ये येऊन पीडित महिलेचा व्हिडिओ काढायचे आणि नंतर २० हजार रुपयांची खंडणी मागत होते.
पोलिसांनी या प्रकरणी रोहित वाघमारे, शुभम धनवटे, राहुल वाघमारे या आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी शहरातील सात ते आठ ठिकाणी असेच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असून, अशा घटनांची शिकार झालेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.