गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. नाना पेठ परिसरात झालेल्या गोळीबारात गणेश कोमकरचा १९ वर्षीय मुलगा आयुष कोमकर ठार झाला. हा हल्ला गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ( Gang War Erupts in Pune: Ayush Komkar Shot Dead in Suspected Revenge for Vanraj Andekar Murder )
घटनेदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी आयुष कोमकरवर गोळीबार केला. तब्बल ११ राऊंड फायरिंगसह धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
वनराज आंदेकर यांच्या खुनात गणेश कोमकर मुख्य आरोपी होता. सध्या तो तुरुंगात असून, त्याच्या मुलाला टार्गेट करण्यात आल्याने आंदेकर-कोमकर टोळी संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आंदेकर समर्थकांकडून बदला घेण्याचा कट पोलिसांनी फोडला होता, मात्र आता या हल्ल्यामुळे तणाव अधिक वाढला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. “चुकीला माफी नाही. मयताला न्याय देणं हे आमचं काम आहे. कुणीही गुन्हा केला तर त्याला सोडणार नाही. गुन्हा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा,” असे पिंगळे म्हणाले.
सध्या पुणे पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला असून गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.