विशेष प्रतिनिधी
पुणे : सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणूक करून परताव्याचे प्रलोभन दाखवून धायरीतील एका सराफी पेढीच्या मालकाने ३६ जणांची ४२ लाख रुपयांची फसवणूक केली. त्याने २१ तोळे सोन्याचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
( Goldsmith along with his wife scammed 36 investors in the Suvarna Bhishi scheme took 42 lakhs and 21 tolas)
सराफी पेढीच्या मालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी श्री ज्वेलर्स सराफ पेढीचे मालक विष्णू सदाशिव दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती दहिवाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यशवंत अंबादास हबीब (वय ३५, रा. नऱ्हे) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे शनिवार पेठेत गेल्या आठ वर्षांपासून नोकरीस आहेत. लग्नाआधी २०२० मध्ये ते धायरी येथे राहण्यास होते. तेव्हा येताजाता त्यांची आरोपींशी ओळख झाली. धायरीत दहिवाळ याची श्री ज्वेलर्स सराफी पेढी आहे. दहिवाळ याने सुवर्ण भिशी योजना जाहीर केली होती. दहिवाळ याच्याशी बोलताना फिर्यादी यांना योजनेबद्दल कळाले. २०२० मध्ये त्यांनी दहिवाळ याच्याकडे महिन्याला एक हजार रुपयांची भिशी लावली. वर्षाअखेर दहिवाळ याने फिर्यादी यांना १३ हजार रुपये दिले. या १३ हजारांमध्ये आणखी काही रक्कम टाकून फिर्यादी यांनी आईसाठी सोन्याची अंगठी केली होती. यानंतर फिर्यादी यांचा दहिवाळ याच्यावर विश्वास बसला.
त्यानंतर फिर्यादी आणि त्यांची पत्नी दोघांनी मिळून एक हजारांच्या एकूण १० भिशी लावल्या. दोघांनी मिळून एक लाख २० हजार भरले. त्याचे दहिवाळ याने एक लाख ३० हजार रुपये दिले. या पैशांचे फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीला १८ ग्रॅम सोन्याचे गंठण केले.
त्यानंतर मे २०२४ नंतर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने सुवर्ण भिशी योजनेत एक लाख ३० हजार रुपये गुंतविले होते. तक्रारदाराने १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडले. मोडीतून आलेले एक लाख ९ हजार रुपये, तसेच आणखी एक लाख रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरुपात दहिवाळ याच्याकडे दिले होते. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून तीन लाख ३९ हजार रुपये जमा केले होते. २५ मे रोजी फिर्यादी सराफी पेढीत गेले. तेव्हा सराफी पेढी बंद असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी चौकशी केली. तेव्हा दहिवाळ दाम्पत्य पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
चौकशीत फिर्यादी यांच्यासह एकूण ३६ जणांनी दहिवाळ याच्या सुवर्ण भिशी योजनेत पैसे गुंतविले होते. दहिवाळ दाम्पत्याने एकूण मिळून ४२ लाख ७८ हजार रुपये, तसेच २१ तोळे सोन्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून पसार झालेल्या दहिवाळ दाम्पत्याचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.