मुंबई : पालक मंत्री नियुक्तीनंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. अनेक मंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या किंवा जवळच्या जिल्ह्याऐवजी दूरच्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्वतःपुरते पाहता असे म्हणत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडूनच अजित पवार आणि सुनील तटकरेंवर निशाणा साधला जात आहे. ( Ajit Pawar, Sunil Takare is targeted by their own ministers)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आता पालकमंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:साठी आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले. परंतु पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाही, अशी भावना मंत्र्यांमध्ये झाली आहे. अनेक मंत्र्यांना स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरचे जिल्हे दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या 10 पैकी केवळ एकालाच स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना स्वजिल्हे देण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच तेवढे स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. तर इतर सर्वांना बाहेरचे जिल्हे मिळाले आहे. भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 पैकी केवळ एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वजिल्हा मिळाला आहे. तर आदिती तटकरेंना स्वजिल्हा मिळाला होता, त्यावर आता स्थगिती आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे याबाबत पत्रकार परिषदेत म्हणाले, विरोधकांना यावरून आयते कोलीत देऊ नये. राज्याचे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीमधील शिवसेना पक्षातील काहींनी नाराजी व्यक्त केलीतटकरे कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली गेली, आंदोलन केली गेली.
मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? असा सवाल करत परांजपे म्हणाले, मुख्यमंत्री दावोसमधून आल्यानंतर अजित पवार आणि सुनील तटकरे त्यांची भेट घेतील. रायगडमध्ये अदिती तटकरे यांनी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. जर भरत गोगावले किंवा इतर कोणालाही याबद्दल तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे करायला हवी होती. पण माधायमांच्या समोर येऊन खालच्या पातळीची टीका करण हे योग्य नाही.