विशेष प्रतिनिधी
जळगाव : तेव्हा तुम्ही झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही शिंदे गटात येतील,असा इशारा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महायुतीवर टीका केली आहे. ठाकरे यांच्या टिकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी उत्तर दिले. ते म्हणाले ,
महायुतीचे आम्ही २३७ आमदार एकत्र असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ठाकरे गटातील २० आमदारांमध्येच सध्या बेबनाव आहे. तुम्ही झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही शिंदे गटात येतील.
पाटील म्हणाले , आम्ही आता २३७ आमदार आहोत. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद उरलेले नाहीत. त्यामुळे आम्ही अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे गेलो तरी काहीच फरक पडणार नाही. ठाकरे गटातील २० आमदारांमध्येच आता मोठे वाद आहेत. आधी त्यांना सांभाळा. विशेषतः भास्कर जाधव यांना आवरा.gulabrao patil aditya
जळगावच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकारे यांच्याबरोबरच मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. त्याबाबतीत विचारले असता, पाटील म्हणाले, राज्यातील महायुतीचे सरकार हे तीन पक्षांचे एकत्रित सरकार आहे. पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. आम्ही सर्वजण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर राखणारे कार्यकर्ते आहोत. प्रारब्धात जे आहे, तेच होईल. आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा जो निर्णय असेल त्याला आमची संमती असेल.