विशेष प्रतिनिधी
कर्जत : अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री पद मिळवलं असतं असे प्रत्युत्तर अघोरी पूजा केल्याचा आरोप करणाऱ्यांना रोजगार हमी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिले आहे.
( Had Aghori Vidya Worked, I Wouldve Already Become Guardian Minister Bharat Gogawales Sharp Rebuttal)
गोगावले यांच्या कथित अघोरी पूजेचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजाा केली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेता वसंत मोरेंनी केली होती. तर त्यानंतर महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडूनही भरत गोगावलेंचा दुसरा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी विद्येचा आरोप केला.
कर्जत येथे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीप्रसंगी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना गोगावले म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही लढणारे आहोत, रडणारे नव्हे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. एकनाथ शिंदेंसारख्या प्रामाणिक नेत्यासोबत आम्ही काम करतो त्यामुळे ही अघोरी विद्या, अघोरी पूजा वगैरे आम्हाला काहीही कळत नाही, आम्हाला ते माहीत नाही. जे नशिबात आहे तेच होतं. अघोरी, बिगारी आम्ही जाणत नाही, साधू महात्मे भेटायला येतात त्यानं आम्ही भेटतो. राष्ट्रवादी कडे मुद्दे नाहीत म्हणून ते शोधाशोध करीत आहेत.
विधानसभेच्या निकालानंतर दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं जाहीर झाली होती . रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने त्याला विरोध केला . त्यामुळे पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू आहे.