विशेष प्रतिनिधी
दिसपूर: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी एक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इस्लामिक देशांतील काही ‘हँडलर’ काँग्रेसच्या समर्थनार्थ ५ हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्स चालवत आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणा या प्रकाराची चौकशी करत आहेत, असेही सरमा यांनी स्पष्ट केले. ( Handlersfrom Islamic countries active in Congress campaignForeign hands behind 5000 social media accounts Serious allegation by Chief Minister Hemant Biswa Sarma)
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “आमच्याकडे ठोस पुरावे आहेत की काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई हे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेच्या निमंत्रणावर तिकडे गेले होते. हे दौरे पर्यटनासाठी नव्हते, तर त्यामागे प्रशिक्षण घेण्याचा हेतू होता, हे स्पष्टपणे समजते.”
सरमा यांनी असा सवालही उपस्थित केला की, “जर काँग्रेस पक्षाकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर त्यांनी या आरोपांवर उघडपणे उत्तर का दिलेले नाही?”
या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केंद्रीय गृह मंत्रालय व निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर, “देशाच्या लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवर या विदेशी हस्तक्षेपाचा गंभीर परिणाम होऊ शकतो,” अशीही तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली आहे आणि आसामातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.