विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मागासवर्गीय तरुणींवर पोलीस अधिकारी आणि इतरांनी कथितपणे छळ, विनयभंग व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी एकत्र येत रविवारी रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रात्री ३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि सामाजिक नेते सहभागी झाले होते. ( Harassment and molestation of backward class girls by police Protest held all night in front of Police Commissionerate)
छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन तरुणींना पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पाच तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी रिमांड रूममध्ये करण्यात आली. या दरम्यान त्यांच्यावर जात आणि धर्मावरून अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची आणि धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.
पीडित तरुणी आणि त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या संघटनांनी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलीस प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत कारवाई केलेली नाही. त्यामुळे संतप्त जमावाने ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, चर्चेअंतीही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुली ज्या घरात भाड्याने राहत होत्या, त्या घरमालकालाही पोलिसांकडून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार केवळ चौकशीपुरता मर्यादित नसून, सामाजिक अन्यायाचा आणि पोलिसी अत्याचाराचा गंभीर नमुना असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली आहे की, जर लवकरात लवकर दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. यासंदर्भात मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडेही तक्रार दाखल करण्याची तयारी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत