विशेष प्रतिनिधी
पुणे: गेल्या १५ वर्षांपासून भूमिगत (अंडरग्राऊंड) असलेल्या कट्टर नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात अटककेली.
प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप असे त्याचे नाव आहे. तो मागील १५ वर्षांपासून अंडरग्राऊंड झाला होता. संगणक आणि लॅपटॉप रिपेरिंग करणारा प्रशांत कांबळे पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी आहे.
मागील १५ वर्षांपासून प्रशांत कांबळे याच्या मागावर पोलीस होते. कांबळे काही वर्षांपूर्वी कबीर कला मंचच्या संपर्कात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर १५, २०१० रोजी तो मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल केली.
२०११ मध्ये संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला ठाण्यातून अटक केली होती. तिचे पुण्यात सक्रिय असणारे सहकारी आणि कबीर कला मंचचे काही कलाकारांनाही या नक्षलवादाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्यावर प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातून मिसिंग झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोन तरुण गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे समोर आल्याने त्यांनाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले. दोघे सर्वोच माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मिलिंद तेलतुंबडेलाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी करण्यात आलं. मिलिंद नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. तर संतोष शेलार आजारी अवस्थेत जानेवारी २०२४ मध्ये पुण्यात घरी आला असताना त्याला अटक केली होती.