विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांवर कामाचा ताण वाढत चालल्याने त्यांना हृदयविकार, उच्चदाब, मधुमेह यासारखे आजार जडू लागले आहेत. अशा आजारांमुळे गेल्या अडीच वर्षांत 427 पोलिसांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता यापुढे 40 वर्षांवरील पोलिसांना वर्षांतून एकदा तर 50 वर्षावरील पोलिसांची वर्षातून दोनवेळा आरोग्याची तपासणी अनिवार्य करण्याचा नियम केल्याची माहिती अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ( Health check-up of police officers will be done at least once a year informed Chief Minister Devendra Fadnavis)
पोलीस खात्यात अनुकंपा तत्त्वावरील भरती मिशन मोडवर राबविणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी ही संकल्पना लागू करण्यात आली आहे. काही वेळा सण-उत्सव किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात. तरीही एकूणच पोलिसांची आठ तासाची ड्यूटी आता स्थिर झाली आहे.
कर्तव्यावर असताना पोलिसांचे होणारे मृत्यू, त्यांच्या पश्चात मुलांना विनाअट पोलीस विभागात नोकरी मिळावी, पोलिसांना परवडणार्या दरात घरे देण्यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न विचारला होता.
पोलिसांसाठी कुटुंब आरोग्य योजना सुरु केली असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात मोफत उपचार करता येणार आहे. तसेच, पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि वरिष्ठ अधिकार्यांशी संवादाची विशेष योजना राबवली असल्याचे फडणवीस म्हणाले.
पोलिसांनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून जागेसाठी अर्ज दिल्यास त्याला नक्कीच मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. नवी मुंबईत पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या 10 हजार क्षमतेच्या सदनिकेसाठी शासनाने सहकारी सोसायटीला सर्वतोपरी मदत केली आहे. अशा प्रकारे सहकार्याने पोलिस एकत्र आले तर त्यांच्या गृहनिर्माणासाठी राज्य सरकारची संपूर्ण मदत मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.