विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरोग्यसेवेच्या सुविधांसाठी महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. राज्यात सर्व प्रकारच्या दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. ही गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी डॉक्टरांची, तज्ञांची मदत आवश्यक असून आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ( Healthcare to the last person with the help of technology Chief Minister appeals to doctors)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 22 व्या मुंबई लाईव्ह इंडोस्कोपी अवॉर्ड 2025 चे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.अमित मायदेव, डॉ.तरंग ग्यानचंदानी, देश विदेशातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळणे अत्यंत गरजेचं असून दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची व आरोग्य सेवकांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
इंडोस्कोपी क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील डॉ.राधिका चव्हाण यांना ‘वूमन इन इंडोस्कोपी’ अवॉर्ड, चंडीगड येथील डॉ. सुरेंदर राणा यांना ‘इंडोस्कोपी एज्युकेटर’ अवॉर्ड, ओडिशाचे डॉ.आशुतोष मोहपात्रा यांना ‘लीडर फ्रॉम टायर 2/3 सिटीज’ अवॉर्ड, राजस्थानचे डॉ.मुकेश कल्ला यांना ‘लीडरशिप’ अवॉर्ड, चंडीगड येथील डॉ.जयंत सामंता यांना ‘इम्पॅक्टफुल पब्लिकेशन’ अवॉर्ड, महाराष्ट्राचे डॉ.अमोल बापये आणि तेलंगणा येथील डॉ.मोहन रामचंदानी यांना ‘टेक्निकल स्कील’ अवॉर्ड आणि महाराष्ट्राचे डॉ.प्रवीण सूर्यवंशी यांना ‘इंडोस्कोपी फॉर सर्जन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.