विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपुरात ८ हजार कोटी
रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला. मॅक्स एरोस्पेस कंपनी हा कारखाना उभारणार असून २०२६ पासून कामाला सुरुवात होणार आहे. ( Helicopter manufacturing factory to be set up in Nagpur)
या प्रकल्पात आठ वर्षांत ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून दोन हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगम आणि ‘मॅक्सएरोस्पेस’चे अध्यक्ष भरत मलकानी यांनी करारासंदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला हा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपूरमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मॅक्स एरोस्पेसला सर्व सहकार्य केले जाईल. कंपनीने आपले उत्पादनाचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करावे.
हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन व पूर्ण उत्पादनासाठी समर्पित हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करणार आहे.
नागपुरात यापूर्वीपासून “फाल्कन’ विमानाचे सुटे भाग तयार होतात. २०२५ मध्ये नागपुरातून पहिल्या फाल्कन २००० एलएक्सएस जेटचे अनावरण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र ते आता पुढे ढकलले आहे. या सोबतच नागपुरात बोईंगचा तसेच इंडमारचा विमान देखभाल दुरुस्ती केंद्र (एमआरओ) आहे.