पुणे : उच्चशिक्षित विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपविले.
सासूकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ,हांडेवाडी रोड भागात ही घटना घडली. ( Highly educated woman commits suicide after being harassed by mother-in-law)
दिपिका प्रमोद जाधव (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मृत विवाहितेच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर, हांडेवाडी रोड) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपिका आणि प्रमोद यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दिपिकाने शेतकी विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. ती खाजगी क्षेत्रात नोकरी करीत होती. तसेच तिचा नवरा सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून कामास आहे. त्यांना मुल उशिरा झाले.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, लग्न झाल्यानंतर सासूने दिपिकाला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच तिच्याकडे वारंवार पैशांची आणि सोन्याची मागणी केली. सासुकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिपिकाने शुक्रवारी (२० जून) दुपारी १२ च्या सुमारास राहत्या घरात सीलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहायक निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.