विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरात मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी ‘हिट अॅण्ड रन’ची घटना घडली. मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा भरधाव चारचाकीने उडविल्याने मृत्यू झाला. त्यानंतर कारचालक तिथून पसार झाला. उंड्री येथील न्याती एस्टबेन सोसायटीजवळ हा अपघात झाला. ( Hit and run in Undri one who went for morning walk dies suspect in custody)
सुजीत कुमार सिंग असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकणी काळेपडळ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत कुमार सिंग हे मॉर्निंग वॉकला निघाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास एका राखाडी रंगाच्या चारचाकी वाहनाने सिंग यांना उडविल्याचे सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सकाळी सव्वासातच्या सुमारास पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सिंग हे रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एएफएमसी रुग्णालयात सिंग यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
सुशील कुमार सिंग हे एका खाजगी सुरक्षा कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामास होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
संशयित वाहनचालक ताब्यात
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. त्यामध्ये एका राखाडी रंगाच्या चारचाकीने सुजीत कुमार सिंग यांना उडविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करीत एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
सुप्रिया सुळेंनी केली
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत वाढत्या रस्ते अपघाताविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच उंड्री येथील घटना दुःखद व दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच उंड्री भागातील नागरिकांना मॉर्निंग वॉक, व्यायाम आणि फिरण्यासाठी उद्यान उभारावे अशी मागणी त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना केली. तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावी अशी सूचना देखील त्यांनी केली.