विशेष प्रतिनिधी
ठाणे : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरणारे प्रकरण ठाण्यात उघडकीस आले असून, मुंबईतील डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेला रविकुमार वर्मा (३५) या तरुणाला पाकिस्तानी महिला हेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवून नौदलाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे. वर्माच्या बँक खात्यात पाकिस्तानातून मोठी आर्थिक रक्कम जमा झाल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आला आहे. ( Honey Trap Engineer arrested in Thane for befriending Pakistani female spy and leaking Navy information)
वर्मा गेली पाच वर्षे कंत्राटी पद्धतीने डॉकयार्डमध्ये काम करत होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याची फेसबुकवर एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि हळूहळू त्या महिलेनं त्याच्याकडून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नौदलाची अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती मिळवली. या माहितीच्या बदल्यात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती, अशी माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे.
२८ मे रोजी एटीएसने रविकुमारला कळवा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्यासोबतच आणखी दोन संशयित व्यक्तींनाही अटक करण्यात आली असून, या प्रकरणी शासकीय गुपिते अधिनियम आणि UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविकुमार अविवाहित असून, तो ठाण्याच्या कळवा परिसरात स्वतःच्या मालकीच्या घरात राहात होता.
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने फेसबुकवर ओळख करून घेतलेल्या महिलेने आपल्याला एका जहाज डिझाईन करणाऱ्या कंपनीत काम करणारी व्यक्ती म्हणून भासवले. यानंतर त्याच्याशी भावनिक नातं निर्माण केल्यानंतर नौदलातील हालचाली, तांत्रिक आराखडे, आणि महत्त्वाच्या क्षेत्रांची माहिती मागवली गेली. त्याने ही माहिती सतत व्हॉट्सअॅपवरून शेअर केली.
या घटनेमुळे देशाच्या संरक्षण यंत्रणेतील सायबर आणि मानवी गुप्तचर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही वर्षांतील अशा प्रकारच्या हनी ट्रॅपच्या घटना वाढत चालल्या आहेत. मार्च २०२४ मध्ये माझगाव डॉकमधील कंत्राटी कामगार कल्पेश बायकर, डिसेंबर २०२३ मध्ये प्रशिक्षणार्थी गौरव पाटील, आणि मे २०२३ मध्ये डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये एचएएलमधील सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाठ यांनाही गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते.
रविकुमार वर्माच्या खात्यात कोणत्या स्त्रोताकडून किती रक्कम जमा झाली, त्याने नक्की कोणती माहिती दिली आणि अजून कोणत्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध होते, याचा तपास एटीएस करत आहे.