विशेष प्रतिनिधी
लखनऊ: उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या हजरतपूर ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार यांना पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी गुप्त माहिती लीक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश अँटी-टेररिझम स्क्वॉड (UP ATS) ने आग्रा येथून रवींद्र कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
( Honey trap; Ordnance factory employee arrested while leaking secret information for ISI)
गेल्या वर्षी फेसबुकद्वारे रवींद्र कुमार यांची ‘नेहा शर्मा’ नावाच्या एका महिलेच्या ओळखी झाली. ती स्वतःला भारतीय असल्याचे सांगत होती, मात्र ती प्रत्यक्षात पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) सोबत संबंधित होती. सुरुवातीला सोशल मीडियावर चॅटिंग, नंतर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद वाढवत तिने रवींद्र यांना आपल्या जाळ्यात ओढले. हळूहळू विश्वास संपादन केल्यानंतर तिने त्यांच्याकडून संवेदनशील लष्करी माहिती मिळवण्यास सुरुवात केली.
रवींद्र कुमार हे ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून काम करत होते. त्यांच्या ताब्यात अनेक गोपनीय कागदपत्रे आणि लष्करी प्रकल्पांविषयीची माहिती होती. तपासात उघड झाले की त्यांनी ISI एजंट महिलेला भारतीय संरक्षण क्षेत्रातील अनेक संवेदनशील माहिती दिली. यात दररोजच्या उत्पादन अहवाल. स्क्रीनिंग कमिटीचे गोपनीय पत्रव्यवहार प्रलंबित मागणी सूची. ड्रोन तंत्रज्ञान आणि गगनयान प्रकल्पाची माहिती यांचा समावेश होता.
ही माहिती त्याने ‘नेहा शर्मा’ या महिलेच्या सांगण्यावरून व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. विशेष म्हणजे, या महिलेने तिला आयएसआयसोबत संबंध असल्याची कबुली दिली होती, तरीही आर्थिक प्रलोभनाने तो तिच्या जाळ्यात अडकला.
रवींद्र कुमार यांनी या महिलेशी संपर्क लपवण्यासाठी तिचा फोन नंबर ‘चंदन स्टोअर कीपर 2’ या नावाने सेव्ह केला होता. तसेच, त्याने थेट पाकिस्तानस्थित ISI हँडलर्सशी संवाद साधत भारताच्या संरक्षण प्रकल्पांबद्दल गोपनीय माहिती पुरवली होती.
रवींद्र कुमार यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये लष्करी ड्रोन चाचण्यांबद्दल आणि 51 गोरखा रायफल्स रेजिमेंटच्या हालचालींशी संबंधित गुप्त दस्तऐवज सापडले. याशिवाय व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावेही हाती लागले आहेत. त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे.