विशेष प्रतिनिधी
पुणे : भाषेवरून गुंडशाही होत असेल तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देतानाच विजयी मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा उघड करत मुख्यमंत्र्यांनी बोचरा सवाल केला. ( Hooliganism based on languagewarning to MNS and Chief Ministers blunt question on Uddhav Thackerays duplicity)
मीरा रोड येथे एका व्यापाऱ्याला मराठी येत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांकडून मनसेविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला.
यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भाषेवरून मारहाण करणे चुकीचे आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे. महाराष्ट्रात राहून मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यांत व्यवसाय करता. अनेकाना तिथली भाषा येत नाही. म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडशाही केली तर योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने उद्या वरळी येथे होणाऱ्या मेळाव्यावर बोलताना आम्ही घेतलेल्या निर्णयावर त्यांना विशेष आनंद झाला आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी विजयी मेळावा घ्यावा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते म्हणाले याच्या पाठीमागची भूमिकाही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. समिती तयार करणारे ते, त्या समितीमध्ये आपल्या उपनद्याला टाकणारे ते. पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी शक्तीची करा या समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणारे ते. कॅबिनेटमध्ये निर्णय घेणारे तेच आणि आता विजयी मेळावा घेणारेही तेच. त्यामुळे मराठी माणसाला लक्षात येते की दुटप्पी कोण आहे.