विशेष प्रतिनिधी
ठाणे : जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी, असा बॅनर मी वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचे स्वागत केले.
राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले, कोकणातील ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आला. शिवसेनेत राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करेल तो पुढे जाईल. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची, कार्यकर्त्यांची आहे. तुम्ही आमच्या शिवसेना परिवारातील आम्हाला तुम्ही सहभागी होताय त्याचा आनंद आहे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो.
राजन साळवी यांच्यासोबत कोकणातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी साळवी म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात आता शतप्रतिशत शिवसेना करणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यावर बातम्या सुरु झाल्या. राजन साळवी यांना विधान परिषद देणार किंवा मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले जावू लागले. परंतु मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळाले. मला काहीच नको. मला फक्त माझ्यासोबत राजापूर मतदार संघातील आलेले शिवसैनिक, पदाधिकारी यांचा योग्य सन्मान व्हावा, हीच अपेक्षा आहे. उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यांनीही मला छोटा भाऊ म्हणून समावून घ्यावे.
राजन साळवी म्हणाले, ९ फेब्रुवारी रोजी मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांच्याकडे शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला कुटुंबात घेण्याची तयारी दर्शवली. आज माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. ३८ वर्ष शिवसेनेत असताना नगरसेवकापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या संपूर्ण वाटचालीत तो पक्ष सोडून नवीन घरात यावे लागत आहे, त्यामुळे एका डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत. दुसऱ्या डोळ्यात आनंदअश्रू आहे. कुटुंबात परत येत आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जावू शकलो नाही.
ठाकरे गट सोडण्याचे कारण सांगताना साळवी म्हणाले, मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ.