विशेष प्रतिनिधी
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्ते उधळून आंदोलन केले. त्यानंतर छावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जोरदार हाणामारी झाली. ( Huge chaos at Sunil Tatkares press conferencecards were thrown a storm broke out between the Chhava organization and NCP workers)
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमधील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकारावर संतापलेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत घुसून “राजीनामा द्या” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यांनी “गेम खेळायचा असेल तर घरी खेळा, सभागृह हे खेळाचं नव्हे, कायद्यासाठी आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेनंतर तटकरे यांना निवेदन सादर करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत टेबलावर थेट पत्ते उधळले आणि घोषणाबाजी सुरू केली.
या प्रकारामुळे वातावरण चिघळले आणि काही क्षणांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात तुंबळ मारामारी झाली.
छावा संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो. आम्हाला तटकरे यांना आमचा विरोध नम्रपणे नोंदवायचा होता. पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही विश्रांतीसाठी एका बाजूच्या खोलीत बसलो होतो. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे आले. आमच्यावर अचानक हल्ला चढवला. मला व माझ्या सहकाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली. सत्तेचा माज काय असतो, हे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून दिलं.
छावा संघटनेने स्पष्ट केलं की, माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ शेतकऱ्यांविषयी असलेल्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे. “शेतकरी आत्महत्या करत असताना, मंत्र्यांना अधिवेशनात पत्ते खेळायची उसंत असते याचे दुःख वाटते. अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही.
या प्रकारात पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रेस्ट हाऊस परिसरात पोलिस उपस्थित असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला.