विशेष प्रतिनिधी
पुणे : पत्नीने प्रियकरासोबत मिळून दिलेल्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. या महिलेचा तिच्या पतीशी प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ( Husband commits suicide due to harassment from wife and her lover)
अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी काॅम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर), तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. दरम्यान, अतुलला पत्नी सोनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादामुळे सोनाली वेगळी राहायला लागली. ती माहेरी निघून गेली.
दरम्यान, त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून धमकाविण्यात आले. पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे अतुल यांनी १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.