विशेष प्रतिनिधी
पुणे : चारित्र्याच्या संशयातून वारंवार मारहाण करणार्या पतीचा पत्नीने मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंबेगावखुर्द परिसरात एका वर्षापूर्वी ही घटना घडली होती. पोलिसांनी एक वर्षांनंतर गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. ( Husband killed by wife for beating her due to suspicion of character)
अभिषेक अजेंटराव (वय २३, रा. चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वृषाली अजेंटराव (वय २३) हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर (वय ३७) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक अजेंटराव हा एका खासगी कंपनीत काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. कारागृहातून तो गेल्या वर्षी सुटला होता. त्यानंतर तो वृषाली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता. वृषाली खाजगी कंपनीत नोकरी करते. गेल्या वर्षी १० जुलै रोजी अभिषेक याने तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण केली. या प्रकाराने वैतागलेल्या वृषाली हिने त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने आघात केला. तसेच त्याच्यावर शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला. ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना समजल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. परंतु, डॉक्टरांना मृत्युचे नेमके निदान करता आले नाही. त्यांनी व्हिसेरा राखून ठेवला. पोलिसांनी अकस्मात मृत्यु झाली तेव्हा नोंद केली होती. घटना घडली तेव्हा आपण घरी नव्हते. अभिषेक हा पडुन जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला असावा, असे वृषाली हिचे म्हणणे होते.
अभिषेकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्याने नेमके कोणत्या कारणावरुन कसा मृत्यु झाला, हे समोर येत नव्हते. आंबेगाव पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर हे प्रकरण आंबेगाव पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले. नुकताच याबाबतचा व्हिसेराचा अहवाल आला. या अहवालावर डॉक्टरांनी आपले निदान सांगून मारहाणीमुळे मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वृषाली अजेंटराव हिच्याकडे पुन्हा चौकशी केली. त्यात तिने आपणच मारल्याचे कबुल केले. पोलिसांनी तिला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.