विशेष प्रतिनिधी
अमरावती : आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. लुटलं तर कर्जमाफी द्यावीच लागेल. आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंगगिरी सुरू झाली, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे.
( I will enter the ministry without announcing the date I will follow Bhagat Singh not Gandhi says Bachchu Kadu)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती. या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही. आत्महत्या केल्यापेक्षा लढा घेऊन बाहेर पडलं पाहिजे. जगात पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले पण इकडे वाढवले. भाव मिळाल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है. रमी खेळू खेळू युवक मरत आहे आणि तिकडे कृषिमंत्री विधानभवनात रमी खेळताय. पुढचं आंदोलन 29 तारखेला होणार आहे. वसंतराव नाईक यांच्या समाधी जवळ आंदोलन करणार आहोत.
नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे ही प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काल रात्री उशिरा नागपूर जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट बच्चू कडू यांना फोन लावून पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली. यावेळी बच्चू कडू यांनीही कारवाई करायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत त्यांची कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले होते.