विशेष प्रतिनिधी
मुंबई : डिनो मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना दिला. (If Dino Morea opens his mouth how many people will be affected Eknath Shindes warning to Thackeray father and son)
विधानसभेत नियम 293 अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँक्रिटचे रस्ते झाल्यानंतर त्यावर 25 वर्षे दुरुस्तीचा खर्च नाही. दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचे पांढरे करून दुरुस्तीच्या नावाने पैसे काढण्याचे काम कोण करत होते? आम्ही डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो. तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हालाही येते. मिठी नदीतील गाळ कोण काढत आहे? त्यांना मराठी माणूस दिसला नाही. तो डिनो मोरिया दिसला. आता त्या मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत.” असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
डिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत. याप्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली होती. डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांची चौकशी झाली आहे.
मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 18 कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. त्यापैकी अनेकांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पालिकेचे 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे.