विशेष प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 1 हजार 310 बसेस खरेदीच्या कंत्राटाला स्थगिती दिली. नंतर हे कंत्राट रद्द केले. त्यांनी यातील फाईल तपासल्या नसत्या तर हा दोन हजार कोटींचा घोटाळा झालेलाच होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कंत्राट रद्द करुन हा घोटाळा रोखला, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. (If the Chief Minister had not checked the files there would have been a scam of Rs 2000 crore in the purchase of ST buses Anil Parab praised Devendra Fadnavis)
एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदार बरसले. एसटीमध्ये अधिकाऱ्यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकळला आहे. अधिकाऱ्यांचे सिंडिकेट आहे, त्याला हात लावण्याची धमक सरकारने दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी व्यक्त केली. परब यांनी एसटी मधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्याला दुजोरा देत दरेकर म्हणाले की, खैरमाटे नावाचा अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधीची मालमत्ता कुठून आली. त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक दुरवस्थेवर विधान परिषदेत झालेल्या चर्चेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटी मध्ये कंत्राटी गाड्या घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे सिंडिकेट तयार झाले आहे. या सिडिंकेटने 1 हजार 310 बसेस खरेदी करण्याचा घाट घातला. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी यात काहीही भ्रष्टाचार झाला नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर थोड्या काळासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष झालेल्यांनी हे सगळं घडू दिलं. मात्र सरकार बदलले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या कंत्राटाला स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केले. त्यांनी यातील फाईल तपासल्या नसत्या तर हा दोन हजार कोटींचा घोटाळा झालेलाच होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कंत्राट रद्द करुन हा घोटाळा रोखला.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले की, कंत्राट रद्द केले असले तरी या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहेत की, या कंत्राटात गडबड झाली, तरी कारवाई होत नाही. यात 20-20 सामन्यातील अध्यक्षांसह अधिकारी दोषी आहेत. तेव्हा याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई अजून झालेली नाही. या चौकशीचं काय झालं याचं उत्तर अनिल परब यांनी मागितले.
दोन हजार कोटींच्या कंत्राटामध्ये कोणकोणते अधिकारी सहभागी होते याची यादीच अनिल परब यांनी सभागृहात वाचून दाखवली. परिवहन विभागातील उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कोसेकर, वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख, प्रभारी महाव्यवस्थापक वाहतूक नितीन मैन, प्रभारी महाव्यवस्थापक अभियांत्रिकी नंदकुमार कोलारकर यांचं हे कार्टल होतं. यांची चौकशी झाली का? मुख्यमंत्री मानतात की यात भ्रष्टाचार झाला, तरीही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही. चौकशीत काय समोर आलं आणि कारवाई झाली का, याचे ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले पाहिजे. यात जर कारवाई झाली नाही तर एसटी कधीच सुधारणार नाही, यावर परिवहन मंत्र्यांकडून कारवाईची मागणी अनिल परब यांनी केली.
एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीमध्ये अधिकाऱ्यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला मंडळाकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. एसटीचा संचित तोटा 10 हजार 962 कोटींचा आहे. एवढ्या तुटीमधून एसटीला बाहेर काढायचे असेल तर कडक धोरण सरकारला घ्यावे लागले. एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून एसटीला रुळावर आणण्याचे प्रयत्न प्रताप सरनाईक यांना करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
एसटी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचे आमिष दाखवून पाच महिन्यांचा संप घडवून आणण्यात आला. यातील एक जण या सभागृहात आहेत, एक जण खालच्या सभागृहात गेले आणि यांचे नेते सदावर्ते आहेत, असा टोला अनिल परब यांनी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्ते यांना लगावला. आता त्यांना एसटी कर्मचाऱ्यांबद्दल कोणतेही दुःख होत नाही. जेव्हा ते विरोधात होते तेव्हा ते एसटी कर्मचाऱ्यांसाठी भांडत होते. डंके की चोट पे एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेणार अशी घोषणा करणारे सदावर्ते आता ताटाखालचे मांजर होऊन बसले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता त्यांचा आवाज निघत नाही. सदाभाऊ खोत आता का बोलत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना हत्यार बनवून यांनी एसटी मारली आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि सदावर्ते यांनी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना खड्यात घातले.
अनिल परब म्हणाले की, एसटी महामंडळाने पाच हजार 50 ई-बसेस घेण्याचे ठरवले होते. यात अट होती, की बस उत्पादक आले पाहिजे. बस उत्पादकांकडून थेट खरेदी केल्या तर कमी किंमतीत मिळणार होत्या. मात्र ओलेट्रा कंपनीसाठी बस खरेदी केल्या जात आहेत. ओलेट्रा कंपनी चायनावरुन बस आणते आणि त्यावर फक्त स्वतःचे स्टिकर चिकटवते, असा आरोप अनिल परब यांनी केला. ई-बस खरेदीत गडबडी आणि त्यानंतर एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान देखील यामुळे झाल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. प्रत्येक ई-बसमागे महामंडळाचे 4000 रुपयांचे नुकासान होत असेल तर एसटी महामंडळ नुकसानीतून बाहेर कसे येणार. अधिकाऱ्यांच्या पातळीवर होणारा भ्रष्टाचार रोखण्याचे आवाहन आणि जे अधिकारी या नुकसानीला कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी अनिल परब यांनी केली.
परब यांनी एसटी महामंडळातील सर्वच विभागांमध्ये कसा भ्रष्टाचार सुरु आहे, याचा कच्चाचिठ्ठा सभागृहात मांडला. वाहतूक, भांडार, लेखा खाते यातील भ्रष्टाचाराची उदाहरणे त्यांनी सांगितली. भांडार अधिकारी वैभव वाकोडे आणि छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ भांडार अधिकारी प्रियदर्शनी वाघ यांच्या बेहिशोबी संपत्तीची लाचलुचपत खात्यांकडून चौकशी सुरु आहे. कामगार आणि संघटनेचा आरोप आहे की, श्रीमती वाघ दागिने घेतात. यांची चौकशी का होत नाही, असा सवाल अनिल परब यांनी केला. वाहतूक खाते हे रुट्स ठरवण्याचे काम करते. तिथेही भ्रष्टाचार बोकाळला आहे. जोपर्यंत खासगी बसेस सुटत नाहीत, तोपर्यंत एसटी त्या रुट्सवर सोडल्या जात नाही. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे, असा संतप्त सवाल परबानी परिवहन मंत्री सरनाईक यांना केला. एसटी महामंडळात ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पिठ खातं’अशी परिस्थिती आहे. एसटीला तुम्ही अर्थ खात्याकडून पैसे आणाल मात्र एसटीमधील भ्रष्टाराचे लिकेजेस् बंद करावे लागणार आहेत. याकडे अनिल परब यांनी सरकारचे लक्ष वेधले.
एसटी महामंडळावरील अर्धा तास चर्चेत भाजप आमदार प्रवीण दरेकर देखील सहभागी झाले ते म्हणाले की, मी एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे एसटी संबंधीच्या माझ्या संवेदना फार जवळच्या आहे. जगात कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट नफ्यामध्ये नसते. महाराष्ट्रात एसटीला असणारी स्पर्धा ओळखली आणि एसटीकडे असलेल्या सुविधा पाहिल्या तर एसटी नफ्यात राहिल याबद्दल मला विश्वास आहे. खासगी बसेसने आरक्षणापासून आरामदायी प्रवास अशा सुविधा देऊन प्रवाशांना आपल्याकडे खेचले आहे. ग्रामीण भागात, टमटम, काळी पिवळी यामध्ये जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करतात. अनिल परब यांनी एसटी मधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्याला दुजोरा देत दरेकर म्हणाले की, खैरमाटे नावाचा अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधीची मालमत्ता कुठून आली. त्याची चौकशी केली पाहिजे. मंत्री प्रताप सरनाईक यांना आता प्रताप दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्याला एसटीला सोन्याचे दिवस आणण्याची संधी मिळाली आहे.