विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : धुब्रीसह आसाममधील विविध भागांमध्ये मंदिरांसमोर गोमांसाचे तुकडे फेकले जाण्याच्या घटनांवरून राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असतानाच मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी परखड भाषेत उत्तर देत खळबळ उडवली आहे. “जर मंदिरासमोर बीफ फेकलं जात असेल, तर हिंदूंनी त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्क फेकावं, त्यामुळे संतुलन साधलं जाईल,” असं सरमा यांनी म्हटलं आहे.
( If they threw beef Hindus should throw pork Chief Minister Sarmas angry response to the cow slaughter case in Dhubri)
बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून २०२५ रोजी धुब्रीतील मुस्लिमबहुल भागातील एका हनुमान मंदिराजवळ गोमातेचं शीर सापडलं. या घटनेनंतर स्थानिक हिंदू समाजात तीव्र संताप उसळला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी खुलासा करत सांगितले की, “धुब्रीत एक इस्लामी गट सक्रिय आहे, जो बांगलादेशातून चालवला जातो. त्याच्याच समर्थकांनी मंदिराबाहेर दगडफेक केली आणि ‘नवीन बांग्ला’ नावाच्या संघटनेचे तीन पोस्टर लावले. ही संघटना धुब्रीला बांगलादेशात विलीन करण्याच्या विचारसरणीची आहे.”
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, “हिंदू कधीही बीफ फेकणार नाहीत. जर त्यांना काही संदेश द्यायचा असता, तर त्यांनी पोर्क फेकलं असतं. जर काँग्रेस म्हणत असेल की गोमातेचं शीर हिंदूंनी फेकलं, तर मग उरलेलं मांस कोठे गेलं? काँग्रेस असं म्हणते आहे का की हिंदूंनी ते खाल्लं?”
सरमा यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारच्या मंदिरद्रोही कृत्यांवर राज्य सरकार कोणतीही माफी देणार नाही. आम्ही पोलिसांना शूट अॅट साइट म्हणजेच पाहताक्षणी गोळी झाडण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी आतापर्यंत ३८ आरोपींना अटक करण्यात आली असून तपास यंत्रणा सतर्क असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आसाममध्ये अशा प्रकारच्या घटनांचा ट्रेंड वाढत असल्याचेही उघड झाले असून, विविध मंदिरांसमोर मांसाचे तुकडे टाकून धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सरमा यांच्यावर काँग्रेसने धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप केला आहे. मात्र सरमा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना खपवून घेतली जाणार नाही. हे राज्य भाजपशासित आहे, आणि येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”