विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे दोघेही मला भावासमान आहेत. जर ते दोघे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले .
( If UddhavRaj Thackeray are coming togetherit will be welcome for Maharashtra Supriya Sule said both are brothers)
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहा दशकांच्या नात्याला उजाळा देत सुळे म्हणाल्या, “दोघांची टोकाची राजकीय मते होती. पण कौटुंबिक संबंध मात्र कायम जपले. हेच संस्कार आमच्यावर झाले आहेत.”उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही मला भावासमान आहेत. जर ते दोघे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. कुटुंब एकत्र येत असेल आणि त्यातून राज्याचा विकास होणार असेल, तर प्रत्येकाने त्या गोष्टीचे कौतुक केले पाहिजे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत. राज आणि उद्धव दोघेही माझ्याहून मोठे आहेत, त्यामुळे मी त्यांना सल्ला देणार नाही.”
राज्याच्या समस्यांवर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, “राज्यातील आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी प्रश्न आणि पाण्याचा तुटवडा यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. या सरकारकडून काहीही अपेक्षा नाही. महिलांच्या अश्रूंवरच हे सरकार उभं आहे, त्यामुळे त्यांना कोणी तरी जाब विचारलाच पाहिजे. ती जबाबदारी माझीही आहे. लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. त्यामुळे मी जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे.
जातनिहाय जनगणनेबाबत सुळे म्हणाल्या, “जातीय जनगणनेची मागणी आम्ही आधीच केली होती. ती आता केंद्र सरकारने मान्य केली आहे, याचे स्वागत करते. तसेच संसदेत महिला आरक्षण विधेयक आम्ही संमत केले आहे. त्याची अंमलबजावणी 2025-26 पर्यंत पूर्ण झाली पाहिजे. 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मे महिन्यात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ आणि नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. या दोन्ही संसदीय समित्यांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत भूमिका स्पष्ट करताना सुळे म्हणाल्या, “जोपर्यंत या प्रकरणावर उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीही विरोधी भूमिका घेणार नाही. आम्ही सरकारला दिलेला शब्द पाळणार आहोत. टीका करण्याची संधी आहे, पण सध्या आम्ही संयम बाळगणार आहोत. संसदेत सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयावर बोलावे आणि देशाला एकतेचा संदेश द्यावा, अशी माझी विनंती आहे