विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी न बोलण्यामुळे मराठी भाषेचे नुकसान होत आहे का? त्यांनी जर मराठीमध्ये बोललं नाही तर काय मराठीला भोकं पडणार आहे का? मराठीमध्ये बोल, मराठी कसे येत नाही, असे म्हणून तुम्ही असुरक्षितता दाखवत आहात, अशा शब्दांत अभिनेत्री केतकी चितळे हिने ठाकरे बंधूंना डिवचले आहे. ( If we dont speak in Marathi will Marathi suffer Ketki Chitales target on Thackeray brothers)
केतकी चितळे हिने काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. तत्कालीन महविकास आघाडी सरकारने केतकीला अटक केली होती. आता पुन्हा केतकीने राजकीय वक्तव्य करत ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे. ती म्हणाली की, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मिशनरी शाळेत का शिकले तिथे पसायदान होत नाही, ते चालते. मराठीमध्ये बोलणं किती महत्त्वपूर्ण, गरजेचे आहे, असे ज्ञान ते तुम्हाला देत आहे असे म्हणत तिने ठाकरे कुटुंबियांवरही टीकास्त्र डागले आहे.
केतकी चितळे म्हणाली की, कुणी मराठी बोलेल नाही बोलणार त्याने मराठी भाषेला नुकसान होत आहे का? भोकं पडत आहे का? असा सवाल तिने केला आहे. नाही पडत नाही. तुम्ही स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात, त्यांना काही फरक पडत नाही.या गोष्टीने कुणाच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. 2024 मध्ये मराठी, बंगाली आणि आसामी भाषांना अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषांनाही केतकी चितळेने विरोध दर्शवला आहे. जर असा दर्जा द्यायचा असेल, तर तो सर्व भाषांना दिला जावा, असे तिचे मत आहे. अभिजात दर्जाची इच्छा ही असुरक्षिततेतून येते. हिंदी आणि उर्दू या भाषांनाही अभिजात दर्जा मिळालेला नाही, पण त्यासाठी कोणी लढतही नाही. अभिजात दर्जा मिळाल्याने काहीही बदलत नाही, उलट असुरक्षितता वाढते.