विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही एखाद्याला चोर चोर म्हणून ओरडत असाल तर उद्रेक होणारच असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभे राहत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उत्तर दिले आहे. आम्ही भाजपमध्ये काम करतो. हा सुसंस्कृत पक्ष आहे. हा मार खाणारा पक्ष नाही, तर सर्जिकल स्ट्राइक करणारा पक्ष असल्याची माहिती पाकिस्तानला सुद्धा असल्याचे खोत म्हणाले. (If you shout like a thief, there will be an outbreak, Sadabhau Khot’s reply to Jitendra Awhad)
विधान भवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावर सदाभाऊ खोत म्हणाले की, सभागृहाला मोठी परंपरा आहे. या सभागृहाचा आम्ही सन्मान ठेवतो अशा परिसरात देशाच्या राज्याच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा भावनेच्या भरात काही गोष्टी घडतात. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहत आहे. माझा लोकप्रतिनिधी विधीमंडळात माझ्या काय व्यथा मांडत आहे. परंतु कालचा जो प्रकार झाला किंवा मागील 2 दिवसांपासून जे होतं आहे हे व्हायला नाही पाहिजे. परंतु जे जेष्ट सदस्य असतात त्यांना सभागृहाचा अनुभव असतो. त्यांना काम कसं कराव हे माहिती असतं. रणांगणावरची लढाई रणांगणात लढायला हवी. हे रणांगण नाही. समाजाचे प्रश्न सोडवण्याचे हे छत्र आहे. इथं काय घडलं तर एक ज्येष्ठ सदस्य उगाचच ओरडत आले चोर चोर चोर म्हणून. या घटनेची पार्श्वभूमी काय आहे? हे तपासणार आहात की नाही.
सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांच्यावर होत असलेल्या मंगळसूत्र चोरीच्या आरोपावर म्हणाले, माझे मित्र गोपीचंद पडळकर खरसुंडी, तालुका आटपाडी येथे एका लग्नाला गेले होते. ते लग्न झाल्यानंतर माझे मित्र दोन तासांनंतर त्या लग्नाच्या ठिकाणी पोहचले. त्यापूर्वी पाहुण्यांची भांडणं झाली होती. त्याठिकाणी ज्यांची भांडण झाली होती त्यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची जवळीक होती. त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि गुन्हा दाखल करायला लावला. एका 65 वर्षाच्या महिलेला यांनी गुन्हा दाखल करायला लावलं. मात्र, माझ्या मित्राला कोर्टाने निर्दोष सोडलं. कारण त्या महिलेने केस मागे घेतली. तरीसुद्धा हे न पाहता तुम्ही एखाद्याला चोर, चोर, चोर म्हणत असाल तर उद्रेक होणार.