विशेष प्रतिनिधी
मुंबई : नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही असे म्हणत राणेंची तुलना लवंग आणि वेलचीसोबत करणारे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना खासदार नारायण राणे यांनी अक्षरश: दम भरला आहे. प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे. ( If you speak more than you deserveI will make you vomitNarayan Rane warns Prakash Mahajan)
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून मंत्री नितेश राणेंवर जहरी टीका केली. त्यामुळे नितेश राणेंचे वडील आणि खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, टीव्ही-9 च्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. राज ठाकरे आणि माझ्या बद्दल आपण जे बोललात, त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? असे सवाल राणेंनी उपस्थित केले आहेत.
कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळाले, म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करू नये, एवढी तुमची कुवत नाही. नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेश यांना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही , असेही त्यांनी म्हटले आहे.