विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “शांतता हवी असेल तर दहशतवाद थांबवावा लागेल,” असा स्पष्ट इशाराच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिला. ( If you want peaceyou have to stop terrorismIndia warns Pakistan
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत अचूक आणि मोजक्या कारवाया केल्या. या कारवायांमागे कोणताही युद्धखोरीचा उद्देश नव्हता, असे भारताने स्पष्ट केले आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सविस्तर माहिती दिली. भारताने केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले केले असून, पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा खंडन करण्यात आले. पाकिस्तानकडून भारताने धरणे आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर भारताने उत्तर दिले की, सर्व टार्गेट्स दहशतवादी होते. लाहोरमधील एका अंत्यसंस्कारात हाफिज रऊफ या दहशतवाद्याची उपस्थिती याचे पुरावे आहेत. पाकिस्तानने गुरुद्वारावर हल्ले करत शीख समुदायालाही लक्ष्य केल्याचे भारताने सांगितले.
७-८ मे दरम्यान पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, अमृतसर, चंदीगड, जालंधर, भुज इत्यादी लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला. मात्र भारतीय UAS ग्रिड आणि एअर डिफेन्स प्रणालीने हे सर्व हल्ले यशस्वीपणे निष्फळ ठरवले, असल्याचेही सांगण्यात आले.
भारताने पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार आणि सिस्टीमवर लक्ष्य करून प्रतिहल्ला केला असून, लाहोरमधील एक महत्त्वाची प्रणाली निष्प्रभ करण्यात आल्याची पुष्टी लष्कराने केली.
दरम्यान पाकिस्तानने एलओसीवर कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरीमध्ये मोर्टार आणि मोठ्या तोफांचा वापर करत गोळीबार केला. या गोळीबारात ३ महिलांसह ५ मुलांचा मृत्यू झाला. भारताने हे निर्दोष नागरिकांचे बळी असून, आपण युद्ध टाळण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे भारताने पुन्हा एकदा सांगितले.
परराष्ट्र सचिवांनी नमूद केले की, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या TRF (The Resistance Front) या संघटनेचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी असून, हे नाव यापूर्वी UN1267 समितीत मांडले गेले आहे. पाकिस्तानने या नावाचा अहवालात उल्लेख होऊ नये म्हणून आक्षेप घेतला होता.
भारताने स्पष्ट केले की, पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख मसूद अझहर आणि हाफिज सईद यांना संरक्षण दिले असून, त्यांचे सरकारातील नेते आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंध असल्याची कबुली देत आहेत.
भारताने मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यांचे वैज्ञानिक पुरावे, कॉल रेकॉर्ड, DNA नमुने आणि संबंधित माहिती पाकिस्तानला दिली होती. मात्र पाकिस्तानकडून न्याय मिळण्याऐवजी या पुराव्यांचा गैरवापर झाला.
विक्रम मिस्री यांनी सांगितले की, सिंधू जलकरार (IWT) ६० वर्षांपासून भारताने पाळला असला तरी पाकिस्तानने सतत कायदेशीर अडथळे निर्माण करून भारताच्या अधिकारांवर गदा आणली. बदललेल्या पर्यावरणीय व धोरणात्मक परिस्थितीत आता या कराराची पुनर्रचना गरजेची असल्याचे भारताचे मत आहे.
भारत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) बैठकीत आपली बाजू मांडणार असून, जगभरात पहलगाम हल्ल्याचा निषेध आणि भारताच्या प्रतिसादाचे समर्थन करण्यात आले आहे. भारताने पुन्हा एकदा सांगितले की, आपल्या कारवाया अचूक, मोजक्या आणि गैरलष्करी लक्ष्यांवर केंद्रित आहेत.