विशेष प्रतिनिधी
नागपूर: अवैध वाळू उत्खननामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच स्थानिक पातळीवर गुंडगिरीही वाढते, अशी कबुली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे विधान चर्चेत आहे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननातही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही वाळू माफिया यांचा त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट असल्याचे आरोप होत आहेत. पोलिसांनी bid जिल्ह्यातील अनेक वाळू माफिया यांच्यावर तडीपारीसारख्या कारवाया केल्या आहेत.
मुंडे म्हणाल्या, वाळू उत्खननासाठी आमच्या विभागाची पर्यावरणीय परवानगी लागते. मात्र तो विषय प्रामुख्याने महसूल विभागाचा आहे. वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागते. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मात्र वाळूचे मर्यादित उत्खनन करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे नदी पात्राचे खोलीकरण होते, पाणी जमिनीत मुरते त्यामुळे वाळू उत्खननाच्या संदर्भात समतोल साधणे आवश्यक आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या
नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही लोकांशी भेटत आहोत. लोकांकडून येणाऱ्या सूचनानुसार लवकरच नवीन नियोजन राज्यसमोर सादर करू, असे मुंडे यांनी सांगितले. नद्या दुर्लक्षित आहे, त्यांची जबाबदारी कोणीही घेत नाही. नदी राज्याची आणि देशाची संपत्ती आहे म्हणून आम्ही त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नियोजन करत आहोत, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सध्या वाळूचा विषय गाजत आहे. सगळ्या वाळू माफियांचा आका मनोज जरांगे आहे. जरांगेंना फिरायला वाळू माफियांच्याच गाड्या होत्या. या वाळू माफियांवर कारवाई करून सरकारकडून जरांगेंच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरु आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.na
तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही केला आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत असलेली वाहने वाळू माफियांची आहेत. जरांगे पाटील वाळू माफियांच्या आधारावर आंदोलन करत आहेत असेही ते म्हणाले आहेत.