विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेवगाव-पाथर्डी महामार्गावर रविवारी दुपारी अतिवृष्टीत दोन दुचाकींची भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळाजवळून जात असताना महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवत अपघातस्थळी धाव घेतली आणि स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला. ( Immediate help at the accident site Minister of State Meghna Bordikars sensitivity in heavy rain)
जोरदार पावसात अपघात पाहून अनेकांनी पुढे जाणे पसंत केले असतानाच मंत्री बोर्डीकर यांनी ताफ्यातील पोलीस वाहन थांबवले आणि अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. जखमींची विचारपूस करत त्यांनी आपल्या ताफ्यातील पोलीस गाडी रुग्णवाहिकेसारखी वापरत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवले. याचवेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करून तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी निर्देश दिले.
या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी, पोलिसांनी आणि राज्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. अपघातातील तिघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत स्थिरता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.