विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानने गुडघे टेकले. भारताने पाकिस्तानला कसा लष्करी तडाका दिला याची अधिकृत माहिती अभ्यास करा तर्फे आज सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ( India hits Pakistan like this destroys Islamabads Chakla Airbase and Sargodha military airport)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले चढवले . इस्लामाबादजवळील चकला एअरबेस, रावी आणि सरगोधा लष्करी विमानतळांसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. हे हल्ले पाकिस्तानच्या एफ-16 फायटर जेट तळांवर, प्रशिक्षण केंद्रांवर, कमांड कंट्रोल युनिट्सवर आणि हवाई संरक्षण प्रणालींवर करण्यात आले, अशी माहिती भारतीय लष्कराच्या वतीने देण्यात आली.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईची पत्रकार परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल एके भारती, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि मेजर जनरल एसएस शारदा यांनी संयुक्तरित्या माहिती दिली.
त्यांनी सांगितले, चकला एअरबेस हा इस्लामाबादमधील सर्वात संवेदनशील आणि प्रमुख लष्करी तळ मानली जाते. सरगोधा हे एफ-16 फायटर विमानांच्या संचालनासाठी वापरले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. भारतीय वायुदलाने या दोन्ही ठिकाणांवर अचूक मिसाइल हल्ले केले. याशिवाय पाकिस्तानच्या हवाई प्रशिक्षण केंद्रांवर आणि कमांड कंट्रोल युनिट्सवरही लक्ष्य साधण्यात आले.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही वेळ स्पष्ट संदेश देण्याची होती. आपण ठामपणे आणि अचूकपणे कारवाई केली. चकला, रावी, सरगोधा – ही नुसती नावे नाहीत, चकला म्हणजे इस्लामाबाद. आपण तिथेही ठोकले. एफ-16 चं मुख्य केंद्र सरगोधाही उद्ध्वस्त केले.
भारतीय लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, जे कोणी दहशतवादाला पाठीशी घालतील, त्यांना भारत कठोर प्रत्युत्तर देणारच. फक्त बदल्याची भावना नाही तर भारताच्या लष्करी ताकदीची जरब त्यांना बसविली जाईल.