विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने मोठी सैन्य कारवाई केली आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने संयुक्तपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील नऊ दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. ( भारताची पाकिस्तानवर मध्यरात्री कारवाई : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त)(India Launches Midnight Counterstrike Operation Sindoor Destroys Nine Terror Camps in Pakistan)
हे हल्ले लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या दहशतवादी तळांवर केंद्रित होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याठिकाणी मोठ्या संख्येने दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे भारताने ठोस आणि ठरवून केलेल्या या कारवाईत बहुतेक तळ जमीनदोस्त करण्यात आले असून दहशतवादी यंत्रणांना मोठा झटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्याची ठिकाणं आणि दहशतवाद्यांची उपस्थिती:
बहावलपूर: २५० पेक्षा अधिक दहशतवादी
मुरिदके: १२० पेक्षा अधिक
मुझफ्फराबाद: ११० ते १३०
कोटली: ७५ ते ८०
सियालकोट: सुमारे १००
गुलपूर: ७५ ते ८०
भींबर: ६० च्या आसपास
चक अमरू: ७० ते ८० दहशतवादी
भारतीय लष्कराने अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून या कारवाईची पुष्टी करत “Justice is Served” असा संदेश दिला आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, युएई आणि रशिया येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची माहिती दिली आहे. भारताने ही कारवाई दहशतवादविरोधी आणि आत्मरक्षणाच्या हेतूने केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईनंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून पाकिस्तानने ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगून त्याचा निषेध केला आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, अशी विनंती काही जागतिक नेत्यांनी केली आहे.