पुणे: भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर शहरात जल्लोष सुरू होता. मात्र काही जणांनी उन्मादातून पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील डान्स केला.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौकात नेहमीप्रमाणे मोठा जल्लोष होत. मात्र यामध्ये काही जण नशेत नाचत होते. पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
दुसऱ्या घटनेत डेक्कन परिसरात दोन गटांत तुंबळ मारहाण झाली.
भारत-न्यूझीलंडमध्ये सामना भारताने जिंकल्यावर तरुणाई रस्त्यावर उतरली. धक्का लागल्याचे निमित्त होऊन डेक्कन परिसरात दोन गटांत हाणामारी झाली. पट्ट्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी एका घटनेत, भारत-न्यूझीलंड क्रिक्रेट सामन्याचे प्रक्षेपण पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौकात रविवारी रात्री घडली. अक्षय दत्तात्रय वाघ (वय २६, रा. साईसिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत दहा ते पंधरा जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.