विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर गुरुवारी रात्री जोरदार ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आणि एकूण ५० ड्रोन पाडून भारताने पाकिस्तानचा हा कट उधळून लावला. ( India Shoots Down 50 Pakistani Drones in Major Retaliation After Operation Sindoor)
उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट यांसारख्या संवेदनशील भागांना लक्ष्य करत पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय सैन्याने एल-70 विमानविरोधी तोफा,तोफा, शिल्का प्रणाली आणि आधुनिक काउंटर-यूएएस उपकरणांचा वापर करून हे सर्व हल्ले यशस्वीपणे निष्फळ ठरवले.
भारतीय सैन्याने हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून, त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की ८ आणि ९ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर हे हल्ले केले. मात्र, प्रत्येक कटाला “जशास तसे” प्रत्युत्तर दिले गेले आहे.
पाकिस्तानने भारताकडून केलेले दावे “निराधार” असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत पाकिस्तानविरोधात “खोटी माहिती” पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पण भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून भारतातील सैन्यतळांवर हल्ला करण्याचा स्पष्ट प्रयत्न करण्यात आला होता.
भारतीय सैन्याने ठामपणे सांगितले आहे की, “पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारताने ताकदीनं उत्तर दिलं आहे आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं हे आमचं सर्वोच्च कर्तव्य आहे.”
भारताने यापूर्वी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत करत मोठी कारवाई केली होती. त्यामुळे पाकिस्तान बिथरलेला असून, सातत्याने आक्रमक कुरघोड्यांचा प्रयत्न करत आहे.