विशेष प्रतिनिधी
तेहरान : भारताने २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ निष्पाप पर्यटकांच्या हत्येनंतर घेतलेल्या पाच कठोर निर्णयांनी पाकिस्तानला झणझणीत चपराक बसली आहे. सिंधू जल करार थांबविण्याचा निर्णय, व्हिसा व उच्चायुक्त सेवा रद्द करणे आणि अटारी चेकपोस्ट बंद करणे या प्रत्येक निर्णयाने पाकिस्तानच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले. परिणामी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आता गुडघ्यावर आले असून, भारताशी वाटाघाटींसाठी गळ घालू लागले आहेत.
( Indias action that hurts Pakistans eyes Sharif on his knees now begging for negotiations)
इराणच्या दौऱ्यावर असलेल्या शरीफ यांनी तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष मसूद पाझ्श्कियान यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत भारतासोबत चर्चेसाठी आपली तयारी दर्शवली. त्यांनी काश्मीर व जलसुरक्षेसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु या वक्तव्यामागे भारताने घेतलेल्या निर्णायक पावलांचा स्पष्ट दबाव दिसून येतो.
शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची भाषा केली, सिंधू नदीवरील करारावर चर्चा करायची तयारी दर्शवली, तसेच व्यापार व दहशतवादावर चर्चा करू अशी विनंती केली. पण यामागे पाकिस्तानची सध्या झालेली कोंडी लपवणे कठीण आहे.
भारताच्या आक्रमक धोरणामुळे आता शरीफ यांना इराण, तुर्की, अझरबैजान व ताजिकिस्तानचा दौरा करत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतोय. ते २९-३० मे रोजी दुशान्बेमध्ये हिमनद्यांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतविरोधी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत.
काश्मीरमध्ये २६ पर्यटकांची गोळीबार करून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जोरदार कारवाई केली होती. त्यानंतर घेतलेल्या निर्णयांनी पाकिस्तानचे पाय लटपटले असून, आंतरराष्ट्रीय दबावाचा उपयोग करून चर्चेची भीक मागण्याशिवाय शरीफ यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.